मुंबई : हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढताना भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी केला.
आज सोमवारी (४ जुलै) शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनात राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केले आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही त्यांनी दिले.
विधिमंडळामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा राज्यघटनेचा अपमान असल्याचे ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंनी यावेळी घटनातज्ज्ञांना विनंती केली. ते म्हणाले, आपण घटनातज्ञ आहात. सध्या जे सुरू आहे ते घटनेला धरून सुरू आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना मोडण्याचा प्रकार सुरू आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या, असे ते म्हणाले.