‘व्हिप’चे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : आमच्याकडे शिवसेनेचे एकूण ४० आमदार झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार आहे. यामुळे खरी शिवसेना आमची आहे. बहुमत चाचणीआधी आम्ही ‘व्हिप’ बजावला होता; पण काही आमदारांनी ‘व्हिप’चे उल्लंघन करून विरोधात मतदान केले. अशा आमदारांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आज विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही. शिंदे आणि भाजप सरकारला १६४ मते तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. शिवसेना-भाजप युती सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमतांनी जिंकला आहे. आज एक आमदार आमच्या बाजूने आला. यामुळे आमची संख्या वाढली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. भाजप आणि शिवसेनेत मतभेद होणार नाहीत. आ. संजय बांगर आज खऱ्या शिवसेनेत आले आहेत. आता आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी जात आहे, असेही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचे सरकार करणार आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. आम्हाला राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. यामुळे सहकारी व विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेऊ. शंभर टक्के कामे करू शकत नाही. मात्र, जितके शक्य होईल तितके काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील. केंद्र सरकारने आम्हाला मदतीचे आश्वासन दिले आहे. यामुळे चिंतेचे कारण नाही. राज्य आणि केंद्र सरकार एकत्र आले तर राज्याचा विकास जलदगतीने होतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आमचे सरकार उरलेला अडीच वर्षांचा कार्यकाळ शंभर टक्के पूर्ण करणार आहे. यापेक्षा जास्त काही बोलत नाही. पुढचे आताच सांगत नाही.

आता मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यामुळे यापुढे आमदारांच्या पत्रांवर तपासून सादर करा अशी लिखापडी बंद करणार आहे. तसेच यापुढे आमदारांसमोरच लगेच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कार्यवाही करा, असे आदेश देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Share