राज्‍यात उद्यापासून माेफत कोविड बूस्टर डोस मोहिमेची अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : उद्यापासून राज्यात पुढील ७५ दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकराने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवेळी दिली.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जन जागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला आहे. बुस्टर डोसची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. हे सरकार शास्त्रीयदृष्ट्या निर्णय घेते. स्वतःहून कोणताही निर्णय घेतला जात नाही. १८ वर्षांवरील जे नागरिक सरकारी रुग्णालयांमध्ये बुस्टर डोस घेतील, त्यांना ते मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती काल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती. देशातील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. बुस्टर डोस सर्व सरकारी केंद्रांवर उपलब्ध असणार आहे.

Share