औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि बा पाटील असं नामांतर करण्याच्या निर्णायाला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्यपालांनी बहूमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत ही स्थगिती दिली गेली आहे. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविरोधात आक्षेप घेतला होता. हे तिन्ही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती समोर येतं आहे.

सरकार कोसळण्यापूर्वी २९ जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. या बैठकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात उपस्थित होते.

Share