पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्यांवर राजीनामा देतात, महाराष्ट्रातील लुटोसिंग खुर्च्यांना चिकटून बसले

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्र्यांवर गैरव्यवहार, घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली होती. यावरून आता ठाकरे गटाचे  मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून शिंदे- फडणीस सरकारवर टीकास्र सोडले आहे.

पंजाब सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री फौजासिंग सरारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते ठेकेदारांकडून वसुली करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून समोर आणली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तत्काळ मंत्री फौजासिंग यांचा राजीनामा घेतला व चौकशीचे आदेश दिले. हा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर घेतला गेला. पण ही अशी नैतिकता आपल्या महाराष्ट्रात तोळाभर तरी शिल्लक आहे काय? मुळात महाराष्ट्रात एक सरकार अनैतिक मार्गाने सत्तेवर आले व ते रोज अनैतिक कामे करत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली; पण ते सर्व मंत्री आजही निर्लज्जासारखे आपल्या खुर्च्यांना चिकटून बसले आहेत, अशी टीका शिवसेनेने ‘सामना’तून केली आहे.

महाराष्ट्रातील सरकार अनैतिक मार्गाने सत्तेवर आले
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली; पण ते सर्व मंत्री आजही निर्लज्जासारखे आपल्या खुच्यांना चिकटून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर दिलेले राजीनामे उठून दिसतात. पंतप्रधान मोदी हे नैतिकतेचे धडे अधूनमधून देत असतात; पण ती नैतिकता महाराष्ट्रात कणभरही झिरपलेली दिसत नाही. त्यामुळे तुमचे ते लोकपाल, लोकायुक्त काय करणार? त्यांचेही निवडणूक आयोगाप्रमाणे राजकीय कळसूत्री बाहुलेच होणार आहे, या शब्दांत शिवसेनेकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री महोदयांना वाटते ते क्रांतिदूत आहेत
जो महाराष्ट्र पुरोगामी व नैतिकतेसाठी देशात अव्वल स्थानी होता, त्या महाराष्ट्राची पत रसातळास गेली आहे. मुख्यमंत्री महोदयांना वाटते ते क्रांतिदूत आहेत. चार महिन्यांपूर्वी आपण कशी क्रांती केली त्याची छापील भाषणे सध्या ते देत आहेत. एकूण १६ भ्रष्ट राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणताही सारासार विचार न करता क्लीन चिट दिली गेली. यालाच क्रांती म्हणायचे काय? अशी विचारणा करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले हे सरकार आहे. नैतिकता त्या चिखलात तळाला बुडाली आहे. आम्ही भ्रष्टाचारावर बोललो की आमचे तोंड दिसते; पण तुमच्या तोंडास काळे फासण्याचे समाजकार्य भारतीय जनता पक्षानेच हाती घेतले आहे, असा टोला शिवसेनेकडून शिंदे गटाला लगावण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारी कामांसाठी एक वेगळीच मार्गदर्शक प्रणाली सध्या महाराष्ट्रात दिसत आहे आणि ती म्हणजे, ‘लुटा आणि खा, थोडे वाटा.’ ही वाटमारी अनैतिक आहे. पंजाबातील मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामे दिले. महाराष्ट्रात नैतिकतेचा दुष्काळ पडलाय. काय करायचे! पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुयावर राजीनामा देतात. महाराष्ट्रातील लुटोसिंग खुच्यांना चिकटून बसले आहेत.

Share