पुणे : एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास ३८ शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेना मोठ्या अडचणीत सापडली आहे. महाविकास आघाडी सरकारही अस्थिर झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. सध्याच्या राजकीय उलथापालथीमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती नेमके कोणते वळण घेणार? याविषयी उत्सुकता असतानाच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी हे सूचक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे वक्तव्य रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.
हीच ती वेळ आहे,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांची,
हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या लेकरांची
हिंदू संस्कृती, संस्काराची
गंभीर परिस्थिती मध्ये भावाने भावाच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याची.
असे आमच्या सारख्या राजकीय कार्यकर्ते यांना वाटते.#खंबीर #ठाकरे_बंधू— Rupalipatilthombare (@Rupalispeak) June 25, 2022
काही महिन्यांपूर्वीच रूपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना संकटात सापडली असताना रूपाली ठोंबरे-पाटील यांनी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच वनवासात जाण्याची वेळ रामावर आल्यानंतर लक्ष्मण सर्वकाही सोडून त्याच्यासोबत गेला होता, असे उदाहरणही पाटील यांनी दिले आहे.
रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामागे कोणाचा दबाव आहे, सत्ता मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट आहे; पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस जगवण्यासाठी, त्याच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. म्हणूनच त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. गंभीर परिस्थितीमध्ये भावाने भावाच्या सोबत खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, असे आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना वाटते, असे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितले. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी तसे ट्विटही केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना आणि मनसेच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.