गेल्या बारा वर्षांपासून वाहनांच्या पीयूसी (प्रदूषण नियंत्रण) चाचणी दरात वाढ करावी यासाठी ऑल महाराष्ट्र पीयूसी ओनर्स असोसिएशन राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याला प्रतिसाद देत चाचणीचे दर ३० ते ३५ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. मात्र, ही दरवाढ मान्य नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
१ एप्रिल २०१९ पासून पीयूसी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने काढले. त्याचे पालन करण्यासाठी राज्यातील २६०० पीयूसी सेंटरपैकी अनेक अद्ययावत झाले. ऑनलाइन इंटरनेट सुविधा खरेदी केली. उच्चशिक्षित संगणक कर्मचारी, सहायक नियुक्त केला. पण दरवाढ नसल्याने अपेक्षित कमाई होत नव्हती. परिणामी पीयूसी सेंटर पांढरा हत्ती पोसण्यासारखे ठरत होते. प्रारंभी बीसएस ४ वाहने असल्याने त्यांना सहा महिन्यांच्या वैधतेचे प्रमाणपत्र दिले जात होते. आता बीएस ६ वाहनांना एक वर्षाचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने वाहनांची संख्या घटली.
परिवहन आयुक्तांचे परिपत्रक : परिवहन आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार २७ एप्रिलपासूनचे दर असे. कंसात आधीचा दर. दुचाकी – ५० रुपये (३५), पेट्रोलवरील तीनचाकी – १०० (७०), पेट्रोल – सीएनजी, एलपीजी चारचाकी – १२५ (९०), डिझेलवर चालणारे जड वाहन – १५० रुपये (११०). ही दरवाढ परवडणारी नसल्याचे ऑल महाराष्ट्र पीयूसी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी सांगितले.