मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी खा. भावना गवळींना ‘ईडी’चे चौथे समन्स

मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ (सक्तवसुली संचालनालय) ने चौथ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खा. भावना गवळी या यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्या अनेक दिवसांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत. खा. गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. ‘ईडी’ ने
खा. भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर गेल्या वर्षी ३० ऑगस्टला छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी छापे टाकून अनेक कागदपत्रे ‘ईडी’ ने जप्त केली होती.

सप्टेंबर महिन्यात खा. गवळी यांच्या पाच संस्थांवर ‘ईडी’ने धाडी टाकल्या होत्या. खा. गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये ‘ईडी’ला १७ कोटींचा व्यवहार दिसून आला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ‘ईडी’ने खा. गवळी यांचा निकटवर्ती सईद खान याला अटव केली होती. सईद खान हा मूळ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी आहे. खान हा खा. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान व अन्य संस्थांच्या आर्थिक कारभारावर लक्ष ठेवत होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सईद खान याची ३.७५ कोटींची मालमत्ता ‘ईडी’ने जप्‍त केली होती.

‘ईडी’ ने खासदार भावना गवळी यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात याआधी तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र, त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नव्हत्या. आता ‘ईडी’ ने त्यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना ५ मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. खा. गवळी यावेळी चौकशीला सामोरे जाणार की नाही? असा प्रश्न आहे. यावेळी जर त्यांनी चौकशीला जाणे टाळले तर ‘ईडी’ त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Share