औरंगाबाद : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणीवरून आज वाद उफाळला. नामांतर लढ्यात बलिदान देणाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करीत रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणारे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर दुपारी शाईफेक करत विद्यापीठ विभाजनास विरोध दर्शविला.
आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर निंबाळकर हे इतर सदस्यासोबत बाहेर येत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. व त्यांच्यावर शाईफेक केली. या वेळी निकम आणि निंबाळकर यांच्या मध्ये झटापट देखील झाले. या वेळी गुणरत्न सोनवणे, पवन पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे नामांतर शहिदांच्या बलिदानाचा हा एक प्रकारे अवमान करून राज्यात दंगली पेटविण्याचे जातीयवादी षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मोठा लढा उभारू. प्रसंगी बलिदान देण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची तयारी आहे. संजय निंबाळकरसारख्या प्रवृत्तींना धडा शिकवून विभाजन हाणून पाडू, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी दिली आहे.