राज ठाकरे यांच्यासह इतर चौघांची निर्दोष मुक्तता

जळगाव : मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, यासाठी मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद २१ ऑक्टोबर २००८ रोजी राज्यातील अनेक ठिकाणांप्रमाणे जळगावातही उमटले होते. याप्रकरणी राज ठाकरेंसह एकूण पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शुक्रवारी जळगाव जिल्हा न्यायालयाने राज ठाकरे यांच्यासह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस माजी आ. जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेत्वृत्वाखाली अॅड.जमील देशपांडे, प्रेमानंद जाधव, रज्जाक यासीन यांनी गोलाणी मार्केट परिसरात डिजीटल बॅनरवर “फाशी द्या लालूला आधी जोडे मारा साल्याला” असे लिहून घोषणाबाजी केली होती. त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदरचे आंदोलन दिसले. तसेच आंदोलन करणाऱ्यांनीही पोलिसांना पाहिल्यावर पळापळ सुरु केली. यावेळी वाहनांचे नुकसान झाले म्हणून शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्टेबल श्यामकान्त पाटील यांनी राज ठाकरे यांच्यासह इतरांविरूध्द २१ ऑक्टोबर २००८ रोजी कलम १४३, १४७, ४२७, १०९, मुंबई पोलिस अॅक्टचे कलम १३५ तसेच महाराष्ट्र डॅमेज अॅक्टचे कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

दरम्यान या खटल्याचे कामकाज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांच्यासमोर २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाले. काल (११ फेब्रुवारी) या घटनेचा निकाल लागला असून न्यायालयासमोर आलेला पुरावा पाहता व खटल्यातील आरोपी पक्षाकडून केलेला युक्तीवाद लक्षात घेऊन न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, अॅड जमील देशंपाडे, प्रेमानंद जाधव आणि यासीन रज्जाक यांची निर्दोष मुक्तता केली.

Share