दंगलींबाबत पोलीसांना तयार राहण्याच्या सुचना – गृहमंत्री

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसच यामुळे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, राज्याच्या पोलिस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत काय अंमलबजावणी करता येईल, त्या दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही हा प्रकार अतिशय गंभीरतेनं घेतला आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. शिवाय, तेढही निर्माण करू नये. त्याचबरोबर अशा प्रकारची कृती झाली, तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

भोंग्यांबाबत निर्णय घेण्याआधी सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चा करणार:

भोंग्यांबाबत राज्यासाठी निर्णय घेण्यापुर्वी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करणार असल्याच वळसे पाटलांनी सांगितल. बैठकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही बोलावणार आहे. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेणार, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Share