मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडून राष्ट्रध्वजाचा अवमान?-जयश्री पाटील

मुंबईः भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप अॅड जयश्री पाटील यांनी केला आहे. ध्वजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आले. हा अचारसंहितेचा भंग ठरत असल्याचे अॅड जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. जयश्री पाटील यांनी केवळ आरोपच केला नाही तर याविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी लोकायुक्तांकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. त्याबाबत माझा काहीच आक्षेप नाही. मात्र प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजवंदन करणारे उपस्थित असतात, यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी सलामी दिली नाही. त्यांना सविधान मान्य नाही का असा सवाल जयश्री पाटील यांनी उपस्थित केला आहे. यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Share