उमेश कोल्हे हत्याकांडाचा सूत्रधार इरफान शेखला अटक; ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

अमरावती : भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अमरावती येथील औषध विक्रेते उमेश शंकरराव कोल्हे (वय ५४) यांची हत्या झाली. उमेश कोल्हे हत्याकांडातील फरार आरोपी शेख इरफान शेख रहीम (वय ३२, रा. कमेला ग्राऊंड, अमरावती) याला अमरावती पोलिसांनी शनिवारी (२ जुलै) नागपुरातून अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला गुरुवार (७ जुलै) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ कडे सोपवण्यात आला असून, ‘एनआयए’ च्या पथकाने अमरावती शहरात दाखल होऊन तपास सुरू केला आहे.

पशु चिकित्सक असलेला युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचा चांगला मित्र होता. गेल्या १५ वर्षांपासून त्यांची ओळख होती. उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली होती. युसूफने या पोस्टचे स्क्रीनशॉट काढले आणि मुस्लिम सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये पाठवले. त्यानंतर कोल्हे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचण्यात आले. उमेश कोल्हे हे २० जून रोजी रात्री दुकान बंद करून घरी जात असताना भररस्त्यात कोल्हे यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती.

उमेश कोल्हे हत्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. या प्रकरणातील मास्टर माईंड आणि सातवा आरोपी शेख इरफान शेख रहीम हा फरार होता. तो शहर सोडून दुसऱ्या शहरात गेल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. इरफान नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळताच शनिवारी नागपुरात पोलिसांनी सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने इरफानला अटक केली. इरफानला सायंकाळी अमरावतीला नेण्यात आले. शेख इरफान हा स्वयंसेवी संस्था चालवत होता. मुख्य आरोपी शमीम आणि त्याच्या मित्रांना इरफाननेच प्रोत्साहन दिले होते. आरोपींना काही पैसे आणि कार उपलब्ध करण्याची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. रविवारी शेख इरफानला न्यायालयात हजर केले असता त्याला ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१५ वर्षांची मैत्री विसरून केला घात

उमेश कोल्हे हत्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी सहा आरोपींअटक केलेल्या सात आरोपींपैकी डॉ. युसूफ खान याच्याशी उमेश कोल्हे यांचे घरगुती संबंध होते. युसूफ खान नेहमीच कोल्हे यांच्या दुकानात जात होता. कोल्हेंच्या अंत्ययात्रेतसुद्धा युसूफ खान सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. उमेश कोल्हे यांनी व्हॉट्सअॅ प ग्रुपमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यात डॉ. युसूफ खान बहादूर खानदेखील होता. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माशी संबंधित पोस्ट स्वत: लिहिलेल्या नव्हत्या, तर सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड केल्या होत्या. युसूफने या पोस्टचे स्क्रीनशॉट काढले आणि मुस्लिम सदस्य असलेल्या अनेक ग्रुपमध्ये पाठवले. ते व्हायरल झाले. त्यानंतर कोल्हेंच्या हत्येचा कट रचण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ खान हा पेशाने पशु चिकित्सक आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. युसूफने उमेश कोल्हेंच्या मेसेजचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले नसते, तर कदाचित कोल्हेंची हत्या झाली नसती.

उमेश कोल्हे यांचे भाऊ महेश यांनी सांगितल्यानुसार, युसूफ खान आणि उमेश कोल्हे यांचे उत्तम संबंध होते. दोघे एकमेकांना २००६ पासून ओळखायचे. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र, युसूफ खान यांनी उमेश यांचा विश्वासघात केला. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी महेश कोल्हे यांनी केली आहे.

Share