राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय? शिवसेना

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता जवळपास १५ दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर आणि भाजपवर जोरदार टिका केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजप पिलावळीला हा प्रश्न पडत होता की राज्यात सरकार आहे का? सरकारचे अस्तित्व दिसत नाही वगैरे टीका होत होती. आता महाराष्ट्राच्या जनतेला नेमका हाच प्रश्न पडला आहे की राज्यात सरकार आहे का? शिवसेनेतल्या फुटीर गटासोबत भाजपने पाट लावून दिल्लीच्या साक्षीने सात फेरे घेतले. पण वाजंत्री बहु गलबला होऊन वऱ्हाडाच्या मुखी गोडाधोडाचा घास जात नाही. महाराष्ट्राची अवस्था ही निर्नायकी झाली आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

महाराष्ट्रात महापुराचा आणि प्रलयाचा हाहाकार माजला आहे. सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत अतिवृष्टी आणि महापुराने ९९ बळी गेले आहेत. तसंच साथीच्या आजारांनीही डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. अशात मुख्यमंत्री एखाद्या अधिकाऱ्याला फोन करतात, सूचना देतात त्याचं लाइव्ह चित्रण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची एक तऱ्हा आहे तर उपमुख्यमंत्र्यांची दुसरीच तऱ्हा आहे. तरीही सरकार कुठे आहे? राज्यपाल महोदय समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत का? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहेत.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला इतका वेळ लागतो आहे याचाच अर्थ शिंदे गट आणि भाजप यांच्यात सर्वकाही आलबेल नाही. मुळात सरकारचा शपथविधी आणि विधानसभेतील बहुमताचा ठराव हा सर्वच घटनाबाह्य प्रकार आहे. राज्यापलांनी कोणाच्या आदेशाने अशा बेकायदेशीर सरकारला शपथ दिली. संसदेच्या नव्या इमारतीवरचा सिंह जबडा उघडून गुरगुरतो आहे. मात्र या सिंहाला न्यायव्यवस्थेचा घास इतक्या सहजासहजी घेता येणार नाही. मारूती कांबळेचं काय झालं या प्रश्नाप्रमाणेच मंत्रिमंडळाचं काय झालं हा प्रश्न आहेच.

मंत्रिमंडळाची पंगत बसयाला काही तयार नाही. महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळा भार वाहात आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना मंत्री करता येत नसेल तर निदान भाजपच्या पंचवीसेक मंत्र्यांना शपथ देऊन राज्यकारभाराला जुंपायला हवं. शिंदे गटातील आमदार हे सत्तेच्या लोभापायी बाहेर पडलेले नाहीत, त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची आस लागली आहे असं दिसत नाही. त्यांना शिवसेना वाचवायची आहे त्यामुळे मंत्रिपद असले काय आणि नसले काय? काही फरक पडत नाही. शिवसेनेत असताना त्यांना मंत्रिपदं मिळालीच होती. पण हिंदुत्वाचा प्रश्न घेऊन त्यांचं बंड झालं असा त्यांचा दावा आहे. तो खरा मानला तरीही सरकारची संपूर्ण स्थापना उगाच का रखडवून ठेवायची? राज्यपालांना अशा स्थितीत वाव आहे. असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून भाजप, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि एकनाथ शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.

Share