वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी  भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली येथील संशोधन सहसंचालक प्रा. इंद्र मणी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. इंद्र मणी यांची नियुक्ती जाहीर केली. कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचा कार्यकाळ दि. ६ मे रोजी संपल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य व कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी प्रा. जगमोहन सिंह राजपूत, निवृत्त महासंचालक, एनसीईआरटी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह  व राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले हे या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. इंद्र मणी यांच्या निवडीची घोषणा केली.

Share