मुंबई : कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून काय आव्हान?
शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो
जय महाराष्ट्र !
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.
माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.
आपला नम्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे