भरधाव कंटेनर दिंडीत घुसला; १५ महिला वारकरी सुखरुप बचावल्या

बीड : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचिती आज बीडमध्ये आली. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड जवळील पाली गावात शेकडो वारकरी भक्त रस्त्याच्या कडेला जेवणासाठी थांबले असताना एका भरधाव कंटेनरने दिंडीमधील पाण्याच्या टँकरला जोरात धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. १५ महिला वारकरी सुखरुप बचावल्या. ‘पांडुरंगाची कृपा म्हणून आम्ही सुखरुप वाचलो’, अशी भावना वारकरी भाविकांनी व्यक्त केली.

सध्या अवघ्या महाराष्ट्रात पंढरपूरच्या आषाढी वारीमुळे भक्तिमय वातावरण आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपानदेव, संत गजानन महाराज आदींचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पायी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. आज मंगळवारी (२८ जून) बीड येथून एक दिंडी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरकडे निघाली होती. वाटेत पाली येथे या दिंडीतील वारकरी जेवणासाठी थांबले होते. त्याचवेळी एक भरधाव कंटेनर दिंडीत घुसला. सुसाट वेगाने धावणाऱ्या या कंटेनरने दिंडीमधील पाण्याच्या टँकरला जोरात धडक दिली. १० ते १५ महिला वारकरी टँकरशेजारी बसल्या होत्या. सुदैवाने त्या या अपघातातून थोडक्यात बचावल्या. या अपघातात टँकरचालक जखमी झाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला.

या अपघातानंतर काही काळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनरचा चालक दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामुळे कंटेनर चालकाला वारकऱ्यांनी चांगलाच चोप दिला.

‘देव तारी त्याला कोण मारी’ ची आली प्रचिती
प्रत्यक्षदर्शी वारकऱ्यांनी सांगितले की, कंटेनरचालक दारू प्यायलेला होता. आम्ही जेवायला बसलो होतो. काही महिला भाविक टँकरच्या बाजूला पाणी पिऊन रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. काही महिला बसल्या होत्या. अचानक कंटेनरचालकाने थेट येऊन दिंडीतील पाण्याच्या टँकरला धडक दिली. त्यामुळे टॅंकर जागेवर पलटी झाला. मात्र, ज्या ठिकाणी टँकर पलटी झाला त्याच बाजूला महिला बसलेल्या असल्याने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला; पण श्री विठ्ठलाच्या कृपेने सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. ‘देव तारी त्याला कोण मारी’ याची प्रचिती यावेळी आली. ‘पांडुरंगासाठीच आम्ही वारीला जातो आहोत. त्याच्या नाम जयघोषात आम्ही प्रवास करतोय, त्याच पांडुरंगाने आम्हाला आज वाचवले’, अशा भावना प्रत्यक्षदर्शी वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Share