याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत आता अयोध्येला जाण्याची तयारी सुरु केली आहे. पण, उत्तर प्रदेशमधील भाजप खासदाराने राज ठाकरेंना थेट आव्हान दिल्यामुळे वाद पेटला आहे. त्यामुळेच कुणी याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये, अशा कडक शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी म्हटलंय की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी… माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत, ते याबाबत बोलतील. इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये.”

तसेच “इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे. जय महाराष्ट्र!” असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्वच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कडक सूचना दिली आहे.

भाजप खासदाराचा राज ठाकरेंना इशारा
उत्तर भारतीयांची माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही,” असा धमकीवजा इशारा भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते, असं ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे

Share