पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी नाकारणे दुर्दैवी : एकनाथ खडसे

मुंबई : राज्यातील भाजपच्या प्रमुख ओबीसी चेहऱ्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले असून, त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मुंडे-महाजन-खडसे-फुंडकर यांनी भाजपला बहुजन चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (गुरुवार) ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरून भाजपला फटकारले. कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात भाजप वाढविण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोलाचा वाटा

खडसे म्हणाले, एक काळ असा होता की, महाराष्ट्रात भाजप हा मारवाडी आणि ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जात असे; पण मुंडे-महाजन-खडसे-फुंडकर यांनी या पक्षाला बहुजन चेहरा प्राप्त करून दिला. एकेकाळी भाजपपासून महाराष्ट्रातील बहुजन समाज दूर होता. त्या काळात दिवंगत प्रा. ना. स. फरांदे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर या नेत्यांनी भाजपचा चेहरा बदलला. महाराष्ट्रात भाजपचे आज जे स्थान आहे, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी संघर्ष करून महाराष्ट्रात भाजपचा पाया रुजवला, पक्षाचा विस्तार केला. अशा परिस्थितीत आज पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेसाठी तिकीट नाकारणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. खेदजनक आहे. ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ज्यांचे काही योगदान नाही, ते अचानक येतात आणि पदावर बसतात; परंतु ज्यांनी उभे आयुष्य पक्षासाठी खर्ची केले, त्यांना मात्र बाजूला ठेवले जाते. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचा विचार झाला पाहिजे होता, असे खडसे यांनी म्हटले.

अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने मला साथ दिली
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याबद्दल शरद पवार आणि अजित पवार यांचे एकनाथ खडसे यांनी यावेळी आभार मानले. मला अडगळीत टाकण्यात आले होते. अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने मला साथ दिली. त्यामुळे आता विधान परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझे राजकीय पुनर्वसन करणाऱ्यांशी प्राामाणिक राहणे, ही माझी भूमिका असेल. काही दिवसांपूर्वी लोक चर्चा करत होते की, ‘एकनाथ खडसे संपले’, ‘ते आता विधिमंडळात परत पाय ठेवत नाहीत’. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांनी विधान परिषदेची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. त्यासाठी मी या दोघांचाही ऋणी असल्याचे खडसे यांनी म्हटले.

मला नाईलाजाने भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये यावे लागले

गेली ४० वर्षे मी भाजपमध्ये निष्ठेने काम करत होतो; पण अनेक वेळा त्या ठिकाणी अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. भाजपत असताना विधान परिषदेसाठी नाव देण्याचे आश्वासन दिले होते. अनेक प्रसंग असे घडत गेले की, त्यामुळे मला नाईलाजाने भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीमध्ये यावे लागले. शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास मी सार्थ करेन. आमच्या भागात भाजप वाढण्यासाठी उभे आयुष्य काढले, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काम करेन, असे खडसे म्हणाले.

राजकीय जीवनात मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सत्ता माझ्यासाठी महत्त्वाची नाही. कारण, बरीच वर्षे मी मंत्री होतो, विरोधी पक्षनेते पदावर होतो. त्यामळे आमदारकीचे कौतुक आहे असे नाही; पण भाजपने ज्या परिस्थितीत मला ढकलले आणि राष्ट्रवादीने मला आधार दिला हे महत्त्वाचे आहे. निवडून आल्यानंतर ज्यांनी माझे राजकीय पुनर्वसन केले त्यांच्याशी प्रामाणिक राहून मी काम करेन, असे खडसे यांनी सांगितले.

Share