उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन भरधाव वेगात जाणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीने चिमुकलीला चिरडले

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा संपल्यानंतर भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीने मोपेडस्वार कुटुंबाला जोरदार धडक दिल्याची घटना काल रात्री एपीआय कॉर्नरजवळ घडली. या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला तर तिचे आई-वडील जखमी झाले आहेत.  श्रावणी सतीश राऊत (वय-४ वर्षे, रा.एन-६ सिडको) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश जगन्नाथ राऊत (वय.४०) त्यांची पत्नी अनिता (वय.३०) आणि त्यांची मुलगी श्रावणी असे तिघेही
(क्र. एम.एच.१५एफ.इ.४६८४) या मोपेडवर नातेवाईकाच्या घरी गेले होते. रात्री तेथून घरी परतत असताना एपीआय कॉर्नर येथील उड्डाणपुलाखालून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात वाहने जात होती. त्यामुळे सतीश यांनी त्यांची मोपेड थांबवली व वाहने जाण्याची वाट पाहत होते. यावेळी चिमुकली श्रावणी मोपेडवर उभी होती. तर पत्नी अनिता पाठीमागे बसल्या होत्या.

त्याचवेळी औरंगाबादकडून जालन्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या (क्र. एम.एच.२५ ए.जे. १७६९) या क्रमांकाच्या बोलेरे वाहनाचा ताबा सुटला व उड्डाणपुलाखाली उभ्या सतिश यांच्या वाहनाला धडकली. बुलेरो धडकताच क्षणार्धात मोपेडच्या समोर उभी असलेली श्रावणी दूरवर फेकल्या गेली. यावेळी श्रावणीच्या अंगावरून बुलेरो गेली. अपघातानंतर बुलेरो चालक वासुदेव माने (रा.उस्मानाबाद) हा पळून गेला होता. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या स्वाधीन केले. बुलेरो वाहनात शिवसैनिक होते. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून उस्मानाबाद येथे जात होते. दरम्यान चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली आहे.

Share