कल्याण लोकसभा कोणाकडे?

कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुती पक्षातील अंतर्गत वाद क्षमून आता वातावरण काहीसे अलबेल झाल्याचे चित्र गेल्या महिन्याभरापासून दिसत आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. विकासकामांवरुन सत्ताधाऱ्यांवर झोड घेणारे इतर पक्षांचे नेते त्यांच्याच मांडीला मांडी लावून कार्यक्रमात एकत्र वावरताना दिसले. राज्यात जागावाटप, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच काही जागांवर युतीतील पक्षांनी दावा केल्याने नाराजीचे चित्र दिसून येत आहेत.

लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते . महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी राज्याचे लक्ष लागले आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याकडे ठाणे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा असून या दोन्ही जागा भाजपकडे जाऊ नये या भूमिकेत शिवसेना शिंदे गट आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असून दोन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले. तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात देखील त्यांनी याच मतदारसंघातून केली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेकडेच हा मतदारसंघ राहणार असे बोलले जात असतानाच भाजपाने देखील येथे चाचपणी केली आहे.

Share