ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह लिखाण करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला न्यायालयाने झटका दिला आहे. केतकी चितळेने जामिनासाठी केलेला अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे.
मराठी टीव्ही मालिकातील अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत लिहिलेली कविता फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यावरून राज्यभर मोठा गदारोळ उडाला. याप्रकरणी केतकी चितळेविरुद्ध ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेला सुरुवातीला पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर केतकी चितळेने जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आज न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळल्याने केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन देण्यात येऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राज्यात १० विविध ठिकाणी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकी चितळेविरोधात वर्ष २०२० मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत केतकी चितळेला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. रबाळे पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी केतकीने न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांचा जवाब येणे बाकी आहे. त्यामुळे केतकीचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.