‘ज्ञानवापी’ प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयात सोमवारी पुढील सुनावणी

वाराणसी : उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित ज्ञानवापी मशीद आणि माता शृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी दुपारी वाराणसी येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अजयकुमार कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात झाली. मुस्लिम पक्षाच्या मागणीवरून न्यायालयाने प्रथम खटल्याची कायदेशीर बाजू जाणून घेतली आणि त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. जवळपास दोन तास युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने ३० मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सुनावणी स्थगित केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसी येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अजयकुमार विश्वेश यांच्या न्यायालयात गेल्या सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. माता श्रृंगार गौरी-ज्ञानवापी प्रकरण सुनावणीयोग्य नाही, असा युक्तिवाद अंजुमन इंतजामिया कमिटीने न्यायाधीश डॉ. अजयकुमार कृष्ण विश्वेश यांच्यापुढे आज केला.

मुस्लिम पक्षाने ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग सापडल्याची चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे. मुस्लिम पक्षाचे वकील अभयनाथ यादव यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, मशि‍दीत शिवलिंग सापडल्याचे सांगून लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवलिंगाचे अस्तित्व कथित आहे आणि ते अद्याप सिद्ध झालेले नाही. यातून जनतेच्या भावना भडकावल्या जात आहेत. अफवांमुळे अशांतता निर्माण होते. त्यामुळे अस्तित्व सिद्ध होईपर्यंत पूजा करू नये. १९९१ च्या प्रार्थना स्थळ कायद्यानुसार हे प्रकरण चालवण्यायोग्य नाही. याआधी मुस्लिम पक्षाने सांगितले की, या कायद्यानुसार १९४७ पर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळाचा दर्जा बदलता येणार नाही. त्यामुळे हे प्रकरण त्या कायद्यांतर्गत सुनावणीसाठी ठेवता येणार नाही.

त्याचवेळी हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयात सांगितले की, ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे नुकसान झाले आहे. अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, हिंदू बाजूचे हे प्रकरण कायम ठेवण्यायोग्य नाही. त्यामुळे नागरी प्रक्रिया संहितेच्या आदेश ७ नियम ११ अन्वये ते रद्द केले जावे. आज वादी-प्रतिवादी पक्षातील एकूण ३४ जणांना न्यायालयात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली. सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशावरून एका वकिलाला न्यायालयाच्या आवारातून हटवण्यात आले.

मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी प्रार्थनास्थळ कायदा १९९१ चे उल्लंघन करून ज्ञानवापीबाबत दाखल केलेला अर्ज फेटाळण्याची मागणीही केली. दुसरीकडे वादींनी आपल्याला ज्ञानवापी परिसराचा सर्व्हे रिपोर्ट फोटो व व्हिडिओसह शुक्रवारी मिळणार असल्याचे सांगितले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

विश्वनाथ मंदिराच्या माजी महंतांचा अन्नत्याग

दरम्यान, श्रीकाशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. तिवारी यांनी अन्नत्याग केला आहे. जोपर्यंत ज्ञानवापी मशीद परिसरामध्ये सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करणार नाही, असे तिवारी यांनी सांगितले. ते म्हणाले, आपल्याबद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवांमुळे आपण दुखावलो आहोत. ज्ञानवापी येथे सापडलेल्या शिवलिंगाच्या पूजेच्या अधिकारासाठी त्यांनी दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आल्याची अफवा काही लोक पद्धतशीरपणे पसरवत आहेत; परंतु तसे काहीही नाही.

Share