नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘खेड – भीमाशंकर’ या मार्गाप्रमाणेच ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यालाही नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती देणारा ट्विट संदेश आज श्री गडकरी यांनी केला आहे. या निर्णयामुळे एकूण ६६ कि.मी. लांबीच्या या नवीन राष्ट्रीय महामार्गामुळे बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, तळेघर ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे खेड, आंबेगाव व जुन्नर या तीनही तालुक्यांच्या पर्यटन विकासात वाढ होईल तसेच परिसरात सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील खेड – भीमाशंकर या मार्गाप्रमाणेच बनकर फाटा – तळेघर या रस्त्यालाही नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. #PragatiKaHighway #GatiShakti
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 18, 2022
महामार्गाच्या कामास लवकरच सुरुवात
‘खेड- भीमाशंकर’ या मार्गाप्रमाणेच ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्याच्या बांधकामविषयक कामाचे लवकरच नियोजन करण्यात येणार असून नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रस्ते-वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने व पर्यटनाला चालना मिळण्याच्या उद्देशाने महामार्गांच्या निर्मितीसाठी व विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.