मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी आज दुपारी अटक केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात त्यांना अटक केली आहे. तसेच शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक दिनेश कुबल, हाजी आलम, शेखर वायगंणकर यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. खार पोलिस ठाण्याच्या अगदी गेटवर सोमय्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. अखेर सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात महाडेश्वर यांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईत राणा दाम्पत्यांनी केलेल्या हायव्हाेल्टेज ड्राम्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना अटक केली. यानंतर शनिवारी रात्री त्यांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आले होते तेथून जाताना सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढविला, या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाले आणि त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले होते. हल्यानंतर किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली आहे.