माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक व सुटका

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोग्याच्या कारणास्तव महाडेश्वर यांचा जामीन मंजूर झाला असून, त्यांची सुटकाही करण्यात आली आहे. याच प्रकरणात शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक दिनेश कुबल, हाजी आलम, शेखर वायगंणकर यांनाही अटक करण्यात आली आहे.

अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे शनिवारी (२३ एप्रिल) रात्री उशिरा खार पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. किरीट सोमय्या या घटनेत जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली. यानंतर किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली होती.आपल्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांकडे हल्लाप्रकरणाचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. खार पोलिस ठाण्याच्या अगदी गेटवर सोमय्यांवर हल्ला झाला होता.
यावेळी खार पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्यांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हेही शिवसैनिकांसोबत उपस्थित होते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह चार जणांना अटक केल्याची माहिती खार पोलिसांनी दिली. या हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. अखेर सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात खार पोलिसांनी आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक केली. आरोग्याच्या कारणास्तव त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे.

Share