छत्रपतीचा अवमान करणाऱ्या कोश्यारींनी माफी मागावी- पटोले

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. परंतू राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींच्या केलेला अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, त्यांनी विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागवी, अशी मागणी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पटोले म्हणाले की, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते असे असतानाही काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करुन रामदास स्वामी हे छत्रपतीशिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कतृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे परंतु रामदास स्वामींना महाराजांचा गुरु दाखवून बुद्धीभेद केला जात आहे. भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे. असे पटोले म्हणाले.

भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ मताची पोळी भाजण्यासाठी वापर करत असतो हे वारंवार दिसून आले आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भाजपचे नेते गप्प कसे बसतात असा सवाल उपस्थित करुन ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे दाखवून देत आहेत असे पटोले म्हणाले.

 

Share