संसदीय लोकशाहीला टाळे लावा : संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मतदान करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. देशातील संपूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने काम करताहेत, हे यानिमित्ताने दिसून आले आहे. विधान परिषदेचे निवडून येणारे सदस्य हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. अशावेळी विधिमंडळ सदस्यांना जर मताचा अधिकार नाकारला जात असेल तर संसदीय लोकशाहीला टाळे लावा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी जामीन देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. देशमुख आणि मलिक या दोघांना अद्याप त्यांच्यावरील आरोपांत दोषी ठरवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद या दोन्ही नेत्यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. तसेच दोघांना मतदानासाठी परवानगी देण्याचा विशेषाधिकार न्यायालयाला असल्याचा दावाही करण्यात आला होता, तर कायद्याने कैद्यांना मतदानाचा हक्क नसल्याचा दावा ईडीतर्फे करण्यात आला होता. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने देशमुख आणि मलिक यांची याचिका फेटाळून लावत त्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता येणार नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक काय गुन्हेगार आहेत का? त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झालाय का? त्यांना शिक्षा ठोठावली आहे का? असे अनेक सवाल खा. राऊत यांनी केले आहेत. देशमुख आणि मलिक यांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

देशातल्या सर्व यंत्रणा कशा दबावाखाली काम करतायेत हे या निमित्ताने पुन्हा दिसून आले आहे. विधान परिषदेचे निवडून येणारे सदस्य हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. अशावेळी विधान सभा सदस्य असणाऱ्या मलिक आणि देशमुखांना जर मताचा अधिकार नाकारला जात असेल तर संसदीय लोकशाहीला टाळे लावा. हे फक्त माझे मत नसून ज्यांना लोकशाहीविषयी कळवळा आहे, त्यांचेही मत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Share