मुंबई : लाऊडस्पीकर बंदीच्या वादानंतर मुंबई पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. या वेळेत लाऊडस्पीकर वाजवले तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
सायलेंट झोनमधील धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरची परवानगी नाही तसेच अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरची परवानगी मिळणार नाही, असे आदेशही पोलिसांनी निर्गमित केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत न काढल्यास मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर लाऊडस्पीकर आणि भोंग्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्सची मुंबई पोलिसांनी सक्त अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांची स्वतंत्र टीम तयार केली गेली आहे. एखाद्या भागात रात्री १० ते सकाळी ६ च्या दरम्यान जर भोंगा वाजला तर आणि संबंधित तक्रार जर कंट्रोल रुमला आली तर पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशानुसार यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
तसेच मुंबई पोलिसांनी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी अशा कामात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय दंड विधान संहिता कलम १४४, १४९ आणि १५१ अंतर्गत समाजविघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासंबंधीची तयारी मुंबई पोलिस करत आहेत. काही लोकांना याबाबत याआधीच नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांचे नेमके निर्देश काय?
- रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण मुंबई शहरात लाऊडस्पीकरवर बंदी असेल.
- सायलेंट झोनमध्ये कुणालाही लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी नसणार आहे.
- अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरची परवानगी मिळणार नाही. अनेक मशिदी आणि मंदिरे कायदेशीररित्या बांधली गेली आहेत, परंतु जी बेकायदेशीर आहेत किंवा सर्व नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत, त्यांना लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही.
- कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, तेढ, तणाव निर्माण करणारी लोकांवर कारवाई होणार.