ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांच्या घोटाळ्याचं तेरावं करूनच थांबणार!

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारला मी आव्हान देतोय. तुम्ही माझी १३ तास काय, १३ दिवस चौकशी करा. उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांच्या घोटाळ्याचं तेरावं किरीट सोमय्या करूनच थांबणार, असा हल्लाबोल भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज केला.

‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी ५७ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्राविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. यासंदर्भात सध्या किरीट सोमय्या व नील सोमय्या यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू आहे.

उद्धव ठाकरे, तुम्ही माझ्या आईला विसरलेला दिसता
आज किरीट सोमय्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी असताना आता किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. “नील सोमय्याही चौकशीला हजर होणार. कोर्टानं नीललाही संरक्षण दिलंय की, या खोट्या एफआयआर आहेत म्हणून. तुमचे नेते संजय राऊत म्हणतात की, आता मेधा सोमय्या यांच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल होणार. उद्धव ठाकरे, तुम्ही माझ्या आईला विसरलेला दिसताय. ९० वर्षांच्या माझ्या आईने सांगितलंय की, उद्धव ठाकरेंना निरोप द्या की, माझ्याविरुद्धही गुन्हा दाखल करा. सगळे सोमय्या चौकशीला सामोरे जायला तयार आहेत”, असे सोमय्या यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे, त्यांचा परिवार आणि सरकार फक्त घोटाळे करून लोकांचे पैसे आणि रक्त शोषतायत. त्यांना वाटतेय, देशात कुणी देशभक्त नागरिक नाही? सोमय्या परिवार महाराष्ट्राच्या सेवेत हजर आहे. एवढा उद्धटपणा महाराष्ट्राची जनता पहिल्यांदा पाहात आहे. आहे काय? ५७ कोटी? ७५०० कोटी? कळेल ना आता. उद्धटपणा थांबवा उद्धव ठाकरे सरकार. माफियांचं महाराष्ट्रात फार काळ चालणार नाही, अशा शब्दांत किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

संजय राऊतांनाही आव्हान
यावेळी किरीट सोमय्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही आव्हान दिले आहे. “संजय राऊत, तुमच्यात हिंमत होती, तर ५७ कोटींची एफआयआर का नाही केली? ७५०० कोटी अमित शाह यांना दिले, याची एफआयआर का नाही केली? नील सोमय्याच्या बोगस कंपनीवर का एफआयआर केली नाही? डरपोक संजय राऊत, माफिया सरकारचा उपोग करून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दाबू शकणार का? मी संजय राऊतांना चॅलेंज करतो. डरपोक संजय राऊतांनी १२ आरोप माझ्यावर केलेत, १२ एफआयआर दाखल कराव्यात”, असे सोमय्या म्हणाले.

Share