मॅगीमुळे मोडला संसार; पत्नी नाश्ता आणि जेवणात फक्त मॅगीच बनवते म्हणून पतीने दिला घटस्फोट

बंगळुरू : एका पुरुषाने आपल्या पत्नीला मॅगीशिवाय काहीच स्वयंपाक करता येत नाही. त्याची पत्नी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाला मॅगीच बनवते. याला वैतागून या पुरुषाने आपल्या पत्नीस घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. अखेर या दोघा पती-पत्नीने घटस्फोट घेतला. कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील हे प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना ‘रेडी टू ईट’ पदार्थ खाण्याची सवय लागली आहे. जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नसल्याने लोक सहज तयार होणारा पदार्थ मॅगी खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मॅगी आवडते; पण यातूनच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅगीमुळे पती-पत्नीचा घटस्फोट झाल्याचे प्रकरण म्हैसूरमध्ये घडले आहे. पत्नी सतत मॅगी खायला घालते. त्यामुळे वैतागून पतीने पत्नीला घटस्फोट दिला आहे. मॅगीच्या या किरकोळ प्रकरणाबाबत या दाम्पत्याने न्यायालयाचा आधार घेतला.

म्हैसूर येथील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीश एम. एल. रघुनाथ यांनी शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी केली. या प्रकरणाबाबत पतीने न्यायालयात सांगितले की, त्याच्या पत्नीला मॅगीशिवाय दुसरे काहीही जेवण बनवता येत नाही. ती नाश्त्यालाही मॅगी बनवते, दुपारच्या जेवणातही मॅगी आणि रात्री जेवणातही मॅगी खायला घालते. ती रेशनमध्येही इन्स्टंट नूडल्स खरेदी करते. त्यामुळे या प्रकरणाचे नाव ‘मॅगी केस’ असे ठेवण्यात आले आहे. अखेर या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

क्षुल्लक कारणांवरून जोडप्यांमध्ये घटस्फोट घेण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याचे सांगून न्यायाधीश एम.एल. रघुनाथ या मॅगी प्रकरणाबाबत म्हणाले, या जोडप्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. सोबतच अलीकडे घटस्फोटात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. कोर्ट बहुतेक जोडप्यांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करते. कधीकधी लोक जुन्या गोष्टी विसरतात आणि नवीन जीवन सुरू करतात. ८००-९०० प्रकरणांपैकी केसेसपैकी २०-३० केसेस कोर्ट सोडवतात. यापूर्वी लोक अदालतीमध्ये ११० प्रकरणांपैकी ३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. सोबतच हल्ली पती-पत्नी यांच्यातील घटस्फोटामागील कारण शारीरिक समस्या पेक्षा अधिक मानसिक समस्या असल्याचेही ते म्हणाले.

Share