राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन जागा; भाजपचे तीनही उमेदवार विजयी

मुंबई : अनेक नाट्यमय वळणे घेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपने सहावी जागा जिंकून महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी करत आपला तिसरा उमेदवार अर्थात धनंजय महाडिक निवडून आणला. महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित शक्तीच्या जिवावर मैदानात उतरलेले शिवसेनेचे संजय पवार यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. चुरस, आकड्यांची जुळवाजुळव, आरोप-प्रत्यारोप, कुरघोडीचे राजकारण, मग निवडणुकीसाठी झालेले मतदान, त्यानंतर शिवसेना आणि भाजपने एकमेकांच्या मतांवर घेतलेला आक्षेप आणि मध्यरात्री रंगलेला सर्व हायव्होल्टेज ड्रामा, तीन मतांवरून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याने रात्री उशिरापर्यंत खोळंबलेली मतमोजणी आणि शेवटी पहाटे मतमोजणी होऊन जाहीर झालेला निकाल अशी नाट्यमय वळणे घेत राज्यातील राज्यसभेची निवडणूक यावेळी चांगलीच रंगली.

अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या निवडणुकीत भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली असून, भाजपचे तीनही उमेदवार जिंकले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या गनिमी काव्यामुळे शिवसेनेचा उमेदवार चितपट झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीत विशेषत: शिवसेना यांच्यात एकेका मतासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. या निवडणुकीत भाजपचे पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय पवार, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व डॉ. अनिल बोंडे यांना सर्वाधिक ४८ मते मिळाली. सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार आमनेसामने होते. या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे ४१ मते मिळवून विजयी झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३९ मते मिळाली. पहिल्या फेरीत संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली तर धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली. मात्र, महाविकास आघाडीला अपेक्षित असलेली १० मते फुटल्याने धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची मते मिळाली. त्यामुळे संजय पवार यांचा केवळ २ मतांनी प्रभाव झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल हे ४३ मते, तर शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत हे ४१ मते मिळवून या निवडणुकीत विजयी झाले आहेत. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली आहेत. इम्रान प्रतापगढी हे उत्तर प्रदेशातील असून, काँग्रेसच्या तिकिटावर ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारला. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले.

Share