महाविकास आघाडी सरकारला ६ आमदारांनी धोका दिला : संजय राऊत

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मते फुटल्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला सहा आमदारांनी धोका दिल्याने शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्याचे सांगून या दगाबाजी करणाऱ्या आमदारांवर जोरदार टीका केली.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीला दगा देणाऱ्या आमदारांची नावे जाहीरपणे सांगितली. राज्यसभा निवडणुकीत आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या आमदारांनी आम्हाला शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही. त्या आमदारांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला असता तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला नसता. विशेषत: वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. तसेच करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेड जिल्ह्यातील लोहाचे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीची सगळी मते जशीच्या तशी आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारातील सहा-सात मते न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे खा. राऊत यांनी सांगितले.

काही घोड्यांवर जास्त बोली लागली
राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मतदान करण्याचे आश्वासन देणाऱ्या काही अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्याने शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. ज्या कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे, त्यांची यादी आमच्याकडे आहे. दगाबाजी करणारे आमदार कोण आहेत, त्यांची नावे आम्हाला माहिती आहेत. घोडेबाजारात काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात विकायला असलेले हे घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की, ते कुठेही जातात; पण विकले जाणारे लोक कुणाचेच नसतात. साधारण ६ अपक्षांनी आम्हाला धोका दिला. त्या अपक्ष आमदारांनी आम्हाला शब्द देऊनही मत दिले नाही. आता त्यांना पाहून घेऊ, असा गर्भित इशारा खा. संजय राऊत यांनी फुटीर आमदारांना दिला.

आम्ही हरलो; पण भाजपचा विजय दैदिप्यमान वगैरे नाही

आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही; पण याचा अर्थ भाजपने दैदिप्यमान विजय मिळवला, असे होत नाही. सहाव्या जागेसाठीच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती, तर भाजपचे धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली होती. हादेखील संजय पवारांचा विजयच आहे; पण शेवटी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया अशी आहे की, त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे; पण भाजपचा मोठा विजय झाला, असे नाही. काही अपेक्षित मते आम्हाला पडू शकली नाहीत हे मात्र खरे आहे. घोडेबाजारातील काही घोडे जास्त किंमतीला विकले गेल्याने संजय पवार यांचा पराभव झाला. कुठे ईडी, कुठे सीबीआय वापरली जाते आणि कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरली जाते का, अशा प्रकारची शंका आता येऊ लागली आहे. आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी संजय पवारांच्या विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. आम्हाला पूर्ण खात्री होती की, आम्ही जागा जिंकू. जर पहिल्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांचा हिशोब झाला असता तर आम्ही जवळजवळ जिंकलो होतो, असेही खा. संजय राऊत यांनी सांगितले.

हा जनादेशाचा कौल नाही, हा तर घोडेबाजाराचा मॅन्डेट
राज्यसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा जनादेशाचा कौल असल्याची बतावणी देवेंद्र फडणवीस करत आहेत. मात्र, हा जनादेशाचा कौल नव्हे तर घोडेबाजाराचा मॅन्डेट आहे, अशी टिप्पणी खा.राऊत यांनी केली. मी फक्त ४२ मतांवर लढतो. मी ती रिस्क घेतली. त्यापैकी १ मत भाजपने बाद ठरवले, असे राऊत यांनी सांगितले.

आमचे एकही मत फुटले नाही
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना असेल, बच्चू कडू असतील, शंकरराव गडाख असतील त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान केले. आमचे एकही मत फुटले नाही. आमच्या चिन्हावर निवडून आलेले म्हणजेच पक्षाचे आमदार तिकडे गेले नाहीत, तर काही अपक्ष आमदार, काही छोट्या पक्षाचे आमदार त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांना काही आमिषं दाखवण्यात आली. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील; परंतु आम्ही उद्या पाहू, असे राऊत म्हणाले.

सुहास कांदेंचे मत बाद का झाले, हा संशोधनाचा विषय

आम्ही नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या मतांचा विचार करत नाही. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत का बाद झाले? हा एक संशोधनाचा विषय आहे. ज्या कारणासाठी कांदे यांचे मत बाद झाले, त्याच कारणासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या मताला आक्षेप घेतला. प्रत्यक्ष मतदान करत असताना कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रदर्शन करायचे नसते हे माहिती असूनही अमरावतीचे एक शहाणे, जे काही उद्योग करत होते, त्यावरून त्यांचेसुद्धा मत घटनेनुसार बाद व्हायला हवे होते; पण फक्त आमचे मत बाद करण्यासाठी पहाटेपर्यंत त्यांचा जो उपक्रम सुरू होता, त्याला आमच्या शुभेच्छा, असा टोलाही खा. राऊत यांनी लगावला.

Share