‘वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा’, राज्यसभा निकालानंतर संभाजीराजेंचा सेनेला टोला

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया समोल आली आहे. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll, असं संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

‘वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते.’ असा ट्विटचा अर्थ असून त्यामुळे संभाजीराजेंनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे लक्षात येते.

दरम्यान, राज्यसभेच्या  सहाव्या जागेवर  संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेना आणि संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारुन पक्षाचा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ, असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घातली. मात्र, ही अट धुडकावून लावली. त्यांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतली.

Share