मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा निर्धार

मुंबई : आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कविवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला, जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार असल्याचेही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. मराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता माळी, संत नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी त्यांच्या साहित्यकृतींतून मराठी भाषा समृद्ध केली. गावखेड्यातल्या बोलीभाषांनी मराठीचे सौंदर्य अधिक वाढवले. आज बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी देशात तिसऱ्या आणि जगात दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी  ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. मराठीची उपयोगिता वाढली पाहिजे. जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळाले पाहिजे. संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच औद्योगिक, आर्थिक, न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून वैयक्तिक जीवनात, व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करुन करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Share