मुंबई : पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भुषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव (बांधकाम) मनोज सौनिक,अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता उपस्थित होते.
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश
राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात आपत्ती विषयक मदत व बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत. त्याचा दररोज आढावा मी स्वत: घेत आहेच. पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव वाढू नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तत्काळ खबरदारी घ्यावी. नद्यांची पात्रे गाळ साचल्यामुळे उथळ झाली आहेत. पात्रांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्याने नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल यासाठी जलसंपदा विभागाने नदया तसेच धरणे यातील गाळ काढण्याबाबत योग्य त्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
#गडचिरोली, #वर्धा, #यवतमाळ, #चंद्रपूर येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सदर बैठकीत घेतला तसेच आपतग्रस्तांना तात्काळ सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रशासनाला निर्देशित केले. pic.twitter.com/W39IyF820E
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2022
वीज अटकाव यंत्रणा प्रभावीपणे राबवा
पूरग्रस्त भागात पूरामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू ओढवला त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत वितरीत झाली आहे. तरीही जे लोक या आपत्तीत जखमी असून उपचार घेत आहेत त्यांच्यावर उपचार देखील वेळेत होण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी. पूरग्रस्त भागातील शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून त्याचे प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी. राज्यात पावसामुळे झालेल्या १०९ मृत्यू पैकी ६० टक्के मृत्यू हे वीज पडून झालेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अंगावर वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी प्रतिबंधक यंत्रणा ही देखील प्रभावीपणे राबविण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत केल्या. यावेळी गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात पूरस्थिती तसेच मदत व बचावकार्याची सविस्तर माहिती बैठकीत दिली.