‘मलिकांचा राजीनामा घ्यावा अन्यथा…’, चंद्रकांत पाटीलांचा इशारा

कोल्हापूरः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीच्या व्यवहार प्रकरणी करण्यात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेत. तर भाजपकडून मात्र या अटकेचे जोरदार समर्थन केले जात असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, अन्यथा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करू देणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील दिला

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ईडीच्या कारवाईनंतर मंत्री नबाब मलीक यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. देशद्रोही खटल्यात मलिक अडकले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे त्यांचा राजीनामा घेत नाहीत. याचा अर्थ हे सरकार दाऊदचे समर्थन करते. मलिक यांच्या अटकेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळ निदर्शने, धरणे आंदोलन करते हे आश्चर्यकारक आहे. मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजपा आंदोलन सुरू ठेवेल. मलिक यांनी खरेदी केलेली तीनशे कोटीची मालमत्ता ही दाऊदसाठीच होती, असा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.

दाऊद इब्राहिमला मुसक्या बांधून भारतात आणू, असा दावा भाजपाने केला होता पण केंद्रात सत्ता असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते. ही या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, दाऊदसह आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना भारतात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि गुन्हे विषयक कायदे अधिक कडक असल्याने त्यात अडसर येत आहेत. तरीही सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. गुन्हा कधीच लपत नाही. आता काही पुरावे समोर आले आहेत. दाऊदच्या प्रॉपर्टी बाबत तपास सुरू होता. फडणवीसांच्या काळात पुरावे समोर आले असते तर ही वेळ आली नसती. देशविरोधी काम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना भारतात आणून  त्यांना शिक्षा होण्याबाबत पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत.तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही असे मलिक म्हणाले.

नवाब मलिक, संजय राठोड, रणजित पाटील असे आघाडीतील मंत्री गुन्ह्यात अडकत आहेत. असे आणखी किती मंत्र्यांवर गंडांतर येऊ शकते? या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, रोज एक नाव पुढे येत आहे. ही परिस्थिती पाहता शिल्लक कोणता मंत्री राहणार हे दुर्बिण घेऊन शोधण्याची वेळ आली आहे. रश्मी शुकला या फोन टॅपिंग प्रकरणांत गुंतल्या असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयाद्वारे कारवाई करायला राज्य सरकारला कोणी अडवलेले नाही, असेही पाटील म्हणाले. तसेच राजू शेट्टी यांना देखील उपोषण करावा लागतोय हे काही योग्य नाही. आम्ही राजू शेट्टी यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असे पाटील म्हणाले.

ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून दूर करावं, अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Share