मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख होणार

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. ३० एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची धुरा सोपविण्यात येणार आहे. मूळचे महाराष्ट्रीयन असलेले सध्याचे लष्करप्रमुख मनोज मुकुंदराव नरवणे या महिन्याच्या अखेरीस ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारतील.

मनोज पांडे हे देशातील पहिले इंजिनीयर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाईल. सध्याचे लष्करप्रमुख मनोज मुकुंदराव नरवणे यांचा २८ महिन्यांचा कार्यकाळ येत्या ३० एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. या महिन्याच्या अखेरीस ते निवृत्त होत आहेत. मनोज नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जनरल एमएम नरवणे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत.

मनोज पांडे यांची लष्करी कारकीर्द
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनीयर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती.

‘ऑपरेशन विजय’ आणि ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये सक्रिय सहभाग

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरले (यूके) पदवीधर आहेत. त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये हायर कमांड कोर्समध्येही सहभाग घेतला आहे. आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ‘ऑपरेशन विजय’ आणि ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.

मनोज पांडे सर्वांत ज्येष्ठ अधिकारी

गेल्या तीन महिन्यांत काही उच्चपदस्थ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर मनोज पांडे हे संरक्षण क्षेत्रात सर्वात ज्येष्ठ अधिकारी बनले आहेत. आर्मी ट्रेनिंग कमांडचे (एआरटीआरएसी) प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल राज शुक्ला ३१ मार्च रोजी निवृत्त झाले. अन्य काही ज्येष्ठ जानेवारीअखेर निवृत्त झाले आहेत. लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती आणि लेफ्टनंट जनरल वायके जोशी ३१ जानेवारीला निवृत्त झाले.

Share