गुणरत्न सदावर्तेंचा पुढील मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्तेंना आता मुंबईला नेण्यात येणार असून, ऑर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल व दगडफेक करून आक्रमक आंदोलन केले होते. पवारांच्या घरावर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईतील गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. गिरगाव न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ऑक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सदावर्तेंना सातारा पोलिसांनी मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले होते. चार दिवसांपूर्वीच सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलिस काेठडी सुनावली हाेती.

पोलिस काेठडीची मुदत संपत असल्याने पोलिसांनी सदावर्तेंना आज सोमवारी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले होते. सरकार आणि बचाव पक्षाने न्यायालयासमोर युक्तिवाद केला. सरकार पक्षाने पुन्हा पोलिस कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चार दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी आर्थर रोड जेल प्रशासनाकडून अ‍ॅड. सदावर्ते यांना ताब्‍यात घेतले होते. आता त्यांना पुन्हा तेथेच सोडण्याची कार्यवाही होणार असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित करणे, मराठा आरक्षणासंदर्भात वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करून मराठा समाजाचा अपमान केला त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे. त्यावरून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Share