‘मराठी माणसाचा स्वाभिमान जपला’; मनसैनिक अयोध्येत दाखल

अयोध्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मनसे नेते, कार्यकर्त्यांनी या दौऱ्याची तयारी सुरू केली. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंना आपला अयोध्या दौरा तुर्तास स्थगित करावा लागला. आता मात्र मनसेचे ठाण्यातील धडाडीचे नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत आल्यावर रविवारी त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले. अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली.

अविनाश जाधव याांनी म्हटलं, “मी अविनाश जाधव मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष… मी आत्ता आहे अयोध्येत. राम जन्मभूमीत आम्ही दाखल झालो आहोत. रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूनने घेतलं पाहिजे. आज मी इथे आलो आहे. मी प्रत्येक मराठी बांधवांना विनंती करतो की तुम्ही अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला या. आज ५ तारीख आहे आणि एक मराठी माणूस अयोध्येत आला आणि त्याने श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे.”

 

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला. इतकेच नाही तर जोपर्यंत उत्तरभारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशाराच बृजभूषण सिंह यांनी दिला होता. राज ठाकरेंनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आणि होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे आपला दौरा स्थगित केला. पण मनसैनिकांनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधाला न जुमानता अयोध्येत दाखल झाले आहेत.

Share