इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणाही हाय अलर्टवर आहेत. इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या इस्लामाबाद येथील बनी गाला या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत. इम्रान खान पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर शाहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आहेत. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. इम्रान खान यांनी अनेकदा आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर हल्लेखोर जगासमोर येणार असल्याचेही म्हटले होते. त्यानंतर आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची चर्चा पसरली आहे.

इस्लामाबादमध्ये जमावबंदीचे आदेश
या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कोणत्याही मेळाव्यास परवानगी नाही. इम्रान खान यांच्या बानी परिसरातील घरासमोरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बनी गाला या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बनी गालामध्ये उपस्थित असलेल्या लोकांची यादी अद्याप पोलिसांना देण्यात आलेली नाही. इस्लामाबाद पोलिस कायद्यानुसार इम्रान खान यांना संपूर्ण सुरक्षा पुरवतील आणि इम्रान खान त्यांच्या सुरक्षा पथकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असे इस्लामाबाद पोलिसांनी म्हटले आहे. आतापर्यंत इस्लामाबाद पोलिसांना इम्रान खान यांच्या टीमकडून हत्येच्या संदर्भातील कोणतीही माहिती मिळाली नाही, असे इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट करत सांगितले आहे.

… तर तो पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल : हसन नियाझी
आमचे नेते इम्रान खान यांना काही झाले तर तो पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल. आम्ही आक्रमकपणे त्याला प्रत्युत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांचे पुतणे हसन नियाझी यांनी व्यक्त केली आहे. रविवारी इम्रान खान आज इस्लामाबादमध्ये येऊ शकतात, असे नियाझी यांनी सांगितले. दरम्यान, याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी इम्रान खान यांना उद्देशून प्रक्षोभक वक्तव्य केले होते. काही परकीय राष्ट्रांनी एक संदेश पाठवला आहे. त्यांना (इम्रान खान) पाकिस्तामधून हटवण्याची गरज आहे, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे परकीय राष्ट्रांनी सांगितले आहे, असे शाहबाज शरिफ म्हणाले होते. त्यानंतर आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

Share