नागपूर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क सक्ती

नागपूर : कोरोनाचा उद्रेक पुन्हा होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व आस्थापनांमध्ये मास्क बंधनकारक करण्यात आले आहे, यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी परिपत्रक जारी करत प्रशासकीय कार्यालयात मास्क घालणे बंधनकारक केल्याचा आदेश जारी केला आहे.

सद्य:स्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील आजाराची लाट अनेक देशांमध्ये कोविड-१९ पसरली आहे. या विषाणूचा शिरकाव येथे सुद्धा भारतात होऊन लाट पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी मास्क हा सर्वांत प्रभावी उपाय आहे, त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, आस्थापनामधील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्व शासकीय, रुग्णालयात खाजगी ‘मॅाक ड्रिल’

जिल्ह्यातील कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात २७ डिसेंबरला ‘मॅाक ड्रिल’चे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तयारी संदर्भातील आढावा या मॅाक ड्रिलदरम्यान घेण्यात येईल. यात रुग्णालयातील खाटांची उपलब्धता,  आवश्यक औषधांची उपलब्धता, कोरोनाची तपासणी, ॲम्ब्युलन्सची उपलब्धता, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, टेलिमेडिसिन सेवा, मनुष्यबळाची उपलब्धता आदींचा आढावा यादरम्यान घेतला जाईल. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विपीन इटकर यांनी दिली आहे.

Share