‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, मनसेचं नवं घोषवाक्य

मुंबई : आगामी निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे.मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. या नोंदणीसाठी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केलं आहे. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे. यावरुन मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्दयावर मनसे आक्रमक होणार असल्याचं दिसून येत आहे.

सभासद नोंदणीला सुरुवात
मनसेच्या सभासद नोंदणीला आजपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथे राज ठाकरेंचं ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिक आणि पदाधिकारी तिथे उपस्थित होते. मनसेच्या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पहिली नोंदणी केली. मनसेने मला सभासद करून घेतले यासाठी मी मनसेचे आभार मानतो, अशी मिश्किल टिपण्णी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली.

दरम्यान, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत, काय काय असावे हे तुम्हाला कळविले जाईल. परंतु, मला ते सर्वत्र दिसायला हवेत असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Share