मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबाद शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याच गुन्ह्याचा दोषारोपपत्र आता न्यायालयात दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी राज यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.

औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची १ मी रोजी सभा झाली होती. मात्र या सभेसाठी राज ठाकरेंना घालून देण्यात आलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी कलम ११६, कलम ११७ आणि कलम १५३ अंतर्गत राज ठाकरेंविरोधात दाखल गुन्हा प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी न्यायालयात उपस्थित राहावे असे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांना ही नोटीस स्पीड पोस्टाने पाठवली आहे.

Share