औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ०१ मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार असल्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितल. तेव्हापासूनच जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज ठाकरे सभा घेणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.
सभेसाठी ज्या ठिकाणाची घोषणा राज ठाकरेंनी केली होती, त्या मराठवाडा सांस्कृतीक मंडळाची रितसर परवानगी देखील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आज मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची परवानगी मिळण्यासाठीचे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकरांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘राज ठाकरेंची सभा ही ऐतिहासिक सभा होणार आहे. यासाठी लोकशाही मार्गाने रितसर परवानगी आम्ही पोलीसांना मागितली आहे. पण “जरी त्यांनी परवानगी दिली नाही तरीसुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा ही होणारचं आहे.” अशी स्पष्ट भूमिका यावेळी त्यांनी मांडली आहे. तसेच सभेपूर्वी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक दि.२० रोजी पार पडणार आहे.’ असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
विरोधकांसाठी राज ठाकरे हे स्वत:ची ब्रॅंडींग करण्याचे साधन
मनसेच्या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. यावर बोलताना खांबेकर म्हणाले, राज ठाकरेंना सध्या संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सगळीकडे फक्त राज ठाकरेंचीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे अशा वेळी राज ठाकरेंविरोधात काही तरी बोलून स्वत:ची पब्लिसिटी करण्याचे काम हे लोक करत आहे. त्यामुळे कोणी कितीही विरोध केला तरी सभा ही होणारचं आहे. अशा शब्दात त्यांनी विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.