ठाकरे व नंदकिशोर चतुर्वेदीच्या भागीदारीची माहिती केंद्राला देणार

मुंबई : हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला ठाकरे परिवाराने लपवले आहे. आज नाही तर उद्या तो निश्चित बाहेर येईल. शुक्रवारी दिल्लीत जाऊन ठाकरे सरकार आणि नंदकिशोर चतुर्वेदीच्या पार्टनरशिपसंदर्भात योग्य माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना देणार आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सांगितले.

‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका मदत निधी घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांची आज (१९ एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. सलग चार दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत सोमय्या यांची चौकशी होणार आहे. आजची चौकशी झाल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे ‘श्रीजी होम्स’ कंपनीत भागीदार असून, या कंपनीमार्फत मुंबईत उभारलेल्या एका बांधकाम प्रकल्पात पाटणकर यांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला आहे. ‘श्रीजी होम्स’ घोटाळ्यातही नंदकिशोर चतुर्वेदीचा हात आहे. नंदकिशोर चतुर्वेदीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचे व्यावहारिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहे, त्याला लपवण्यासाठी ठाकरे सरकारने काही तरी कारस्थान केले असणार, असा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.

महाराष्ट्राला ठाकरे परिवार लुटत आहे ते थांबवणे आणि माफिया घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई यावर आमचे लक्ष आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हातात आला तर आणखी माहिती हातात येईल. ठाकरे परिवाराने किती मनी लॉन्ड्रिंग केले हे कळेल, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली २०१३ मध्ये गोळा केलेला ५७ कोटी रुपये निधी राज्यपाल कार्यालयात जमा न करता त्याचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील रक्कम १० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा निल सोमय्या यांना चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. त्यानुसार सोमय्या आज आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीस हजर झाले.

Share