कोविड विमा योजनेला मुदतवाढ

नवी दिल्ली : कोरोना (कोविड-१९) काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विमा योजनेला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत परिपत्रक काढले आहे. केंद्रीय अतिरिक्त आरोग्य सचिवांनी हे परिपत्रक काढले असून, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही या योजनेला मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKP) आणलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या विमा योजनेस आणखी १८० दिवसांसाठी अर्थात सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. १९ एप्रिल २०२२ पासून या विमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. कोविडच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना याची मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

PMGKP ही विमा योजना ३० मार्च २०२० रोजी लॉन्च करण्यात आली होती. यामध्ये सर्वसमावेशक ५० लाखांचा वैयक्तिक अपघात विम्याचा लाभ देण्यात आला आहे. २२.१२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार होता. यामध्ये कम्युनिटी आरोग्य कर्मचारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांचा कोविडच्या रुग्णांशी थेट संबंध येतो. त्यांना अतिजोखीम पत्करून काम करावे लागते. ज्यामुळे त्यांचे जीवन हे कायम हायरिस्कमध्ये असते. ही योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत १९०५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या सर्वांचे विमा दावे निकाली काढण्यात आले आहेत.

Share