मंत्री दादा भुसेंची तरुणांना पोलिसांसमोर मारहाण; आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट

नागपूर : राज्यातील शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत असतानाच आता बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे  देखील वादात सापडले आहे. दादा भुसे यांचा एक शिव्या देताना आणि दोन तरुणांना मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेयर करत म्हटलं आहे की, मंत्री दादा भुसे एका युवकाला पोलिसांसमोर फटकावतात. शिव्या देतात… मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस दाखल करणार? माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केली. सर्वोच्च न्यायालयात रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक झाली. आता बोला

“माझ्यासाठी वकिलांची मोठी फौज आणि पोलिसांची खोटी प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात द्यायला लावली. मी सराईत गुन्हेगार आहे, असे पोलीस सर्वोच्च न्यायालयात पत्र देतात… वाह साहेब आपण मला फाशी देऊ शकत नाही, किंवा मुडदाही पाडू शकत नाही, असे आव्हाड यांनी म्हटलं.

माझ्या विरुद्ध जिने ३५४ दाखल केला, जिने रात्री आपली भेट घेतली, तिच्याविरोधात जबरदस्ती करुन छोट्या पोरींना शरीर विक्री करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. आपण माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचलंत. आपण मित्र होतो… विसरलात,असा प्रश्न आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.

दरम्यान, व्हिडीओत मंत्री दादा भुसे या तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे. या तरुणांची नेमकी चूक काय होती? कोणत्या कारणासाठी दादा भुसे तरुणांना मारहाण करत आहेत? हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर देण्यात येतं ? विरोधक याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार का? हे लवकरच समजेल.

Share