Salman Khan B’day Spl : सलमान खानची पहिली कमाई होती फक्त…

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजेच, सलमान खान आज ५८ वर्षांचा झाला.या खास दिवशी त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सलमान खानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान आणि सुलतान या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. गेली अनेक दशके तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

२७ डिसेंबर १९६५ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सलमानचा जन्म झाला. त्याचा चाहता वर्ग आज जगभरात आहे. प्रसिद्ध चित्रपट लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक उर्फ सलमा यांचा तो मोठा मुलगा आहे. सलमानचं पूर्ण नाव अब्दुल रशीद सलमान खान असं आहे.

कोट्यवधी संपत्तीचा आहे मालक
सलमान खानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याची पहिली कमाई फक्त ७५ रुपये होती. पण आज सलमान कोटींमध्ये कमवत आहे. भारतातील अनेक शहरात त्याच्या नावे संपत्ती आहे. एवढंच नाहीतर बीइंग ह्युमन नावाचा त्याच्या स्वतःचा ब्रँडही आहे. जो खूपच प्रसिद्ध आहे.

सलमानचे प्रमुख चित्रपट
‘मैंने प्यार किया’, ‘सनम बेवफा’, ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’, ‘करण अर्जुन’, ‘जुडवां’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘बीवी नंबर वन’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘नो एंट्री’, ‘पार्टनर’, ‘वाँटेड’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ ‘दबंग २’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘रेस’, राधे, ‘अंतिम’.
खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत
सलमान खान हा नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. मग ते एखाद्या अभिनेत्रीशी जोडलेलं नाव असो, हिट अँड रन केस असो वा काळ्या हरिणाच्या शिकारीचा खटला असो. ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवाही खावी लागली होती. पण त्याच्या प्रसिद्धीमध्ये घट झालेली नाही. कारण सलमानचे चाहते नेहमीच त्याला चांगल्या मनाचा माणूस मानतात. जो गरजूंच्या मदतीला नेहमी तत्पर असतो. सलमान खान वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

Share