आमदार जिग्नेश मेवाणींसह १० जणांना तीन महिन्यांचा कारावास

गांधीनगर : गुजरातमधील मेहसाणा येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज गुरुवारी अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना २०१७ मध्ये परवानगीशिवाय ‘आझादी मोर्चा’ काढल्याप्रकरणी दोषी ठरवून तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात एकूण १० जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यामध्ये आ. जिग्नेश मेवाणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रेश्मा पटेल व इतर आठ जणांचा समावेश आहे.

१२ जुलै २०१७ रोजी उना येथील घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आमदार जिग्नेश मेवाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहसाणा ते धानेरापर्यंत ‘आझादी कूच’ रॅलीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय दलित अधिकार मंच या संघटनेच्या बॅनरखाली मेहसाणा शहरातून काढलेल्या या रॅलीसाठी मेहसाणा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. सुरुवातीला ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, नंतर परवानगी दिल्याचा निर्णय मागे घेत ही परवानगी नाकारली होती. या रॅलीमध्ये कन्हैया कुमारदेखील सहभागी झाले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या विषयातील आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले तेव्हा कन्हैय्या कुमार न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे कन्हैय्या कुमार यांच्यावर स्वतंत्र खटला चालवण्याचा आदेश देण्यात आला होता.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार यांनी याबाबत निकाल देताना काही निरीक्षणांची नोंद केली आहे. यामध्ये “रॅली काढणे हा गुन्हा नसून परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे”, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन कधीही सहन केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले. १० आरोपींना दोषी ठरवताना, न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपी कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशाला योग्य उच्च अधिकार्‍यांसमोर आव्हान देऊ शकले असते आणि नंतर योग्य परवानगी मिळाल्यानंतर रॅली काढू शकले असते.

Share